10:09 PM

वादळवेडी

आतल्यासहित माणूस या प्रयोगात ही कविता होती. पेशव्याची 'प्रिय' ही कविता आणि माझी 'वादळवेडी' अश्या दोन्ही कविता एकत्र गुंफून तो बीट तयार केला होता. 'प्रिय' ने सुरूवात व्हायची मग 'वादळवेडी'चा पहिला भाग मग परत 'प्रिय' चा उरलेला भाग आणि 'वादळवेडी'च्या पुढच्या भागाने शेवट. रंगमंचावर १० एक मीटरचं गुलबक्षी रंगावर सोनेरी अक्षरं असलेलं पत्र अनफोल्ड होत जायचं आणि दुसर्‍या विंगेत ते विरून जायचं. प्रयोगातल्या माझ्या लाडक्या बिटस पैकी हा एक होता. अंबरीष देशपांडे, मयूर हरदास आणि राजेश्वरी वैद्य करायचे पण मस्त.
http://sites.google.com/site/neerajasspace/aatalyasahitmaan इथे वरून दुसर्‍या ओळीतले डावीकडचे दोन फोटो. पहिला आहे तो प्रिय कवितेचा दुसरा भाग/ शेवट आणि दुसरा आहे तो वादळवेडीचा शेवट.
-------------------------------------------------------------
तिला सुसाट वार्‍याचं वेड होतं
वेळीअवेळी बांबुच्या बनातुन वारा घुमायचा,
अन् तिच्या पोटातुन चंद्र आडवा उभा सरकायचा.
भारल्यासारखी ती बाहेर पडायची,
पिसाटल्यासारखी काहितरी शोधत रहायची
"कन्या राजे पुरे आता, परतूया."
धापा टाकत दासी म्हणायची.


हो, तशी ती होती राजकन्या,
लाडाकोडात वाढलेली, दुधातुपात न्हायलेली.
तिच्यासाठी महालात कितीतरी झरोके होते,
भर दुपारी मंद झुळका येईल असे,
आणि कितीतरी पंखे,
गोर्‍या साहेबाच्या राज्यातले.
पण तरी तिला सुसाट वार्‍याचं वेड होतं!

एकदा अरण्यात रानपाखरं अचानक ओरडायला लागली
मिळेल त्या आसर्‍याला जाउन राह्यली.
तिनं चकीत होऊन बघितलं
येणार्‍या वार्‍याच्या लोळानं तिला खेचून घेतलं.
जीवाच्या जिवलगानं मिठीत घ्यावं तसं.
तिनंही त्या वादळाला सगळं अर्पून टाकलं
हलकी झाली आणि हवेत वर वर चालली
असं तिला सुसाट वार्‍याचं वेड होतं

वेडे लोक!
सांगतात तिला झंझावातानं उडवून नेलं

- नी

9:41 PM

गंमतीची गोष्ट

मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं
हा आपलातुपला गंमतनाच!


नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.


खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?


जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.


'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून


आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!


स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!


-इतिश्री निर्जाबाई उवाच!!

1:37 AM

ताल कध्धी चुकतच नाय!

जळमट धूळ जिकडे तिकडे
पसार्‍यात कायच सापडत नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

काम पडलीत, धामं अडलीत
लक्ष मुळी लागतच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

भूक नाही, झोपही नाही
कंटाळ्याने पसरले पाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

रडणं राह्यलं, हसणं वाह्यलं
शून्याचा पाढा घोकत जाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

कोपरा न कोपरा लख्ख केला
डोक्यामध्धे कायच नाय
उनच्चुन घामच्च्घाम
ताल कध्धी चुकतच नाय!

-नी

11:54 AM

क्रिएटिविटीच्या भुता...

क्रिएटिविटीच्या भुता,
तुला कोटी कोटी प्रणाम.
अचानक गायब होऊन
आमची मारून ठेवणार्‍या
तुझ्या कुत्रेपणाला काय म्हणावे!!!

का मेल्या तू अस्तित्वातच नाहीस?
तसं खरतर विश्वासही नाही माझा
भुताखेतांवर, आत्म्यांवर
त्यामुळे बहुतेक मला आत्मा नाही
आणि क्रिएटिविटीचे भूत सुद्धा. . .

-नी

11:50 AM

कुणाच्या ह्या वेणा

कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे

गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले

वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी

झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रूततोय आरपार

कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला

-नी

11:49 AM

हंस उडू पाही...

चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे

अशी दरी खोल असे उंच कडे
आभाळापल्याड झेपावती झाडे

वारा सैरभैर, वेडी लाट फुटे
धिटाईने घुसे कुणी एकटे एकटे

लावले कुलुप, बंद केली दारे
आतला हुंकार तरीही थरारे

11:48 AM

झनन झन झन!

तुझ्या बोटांनी मल्हार छेडला
माझा कण कण सतार झाला

झनन झन झन खेळ रंगला
गोंदण गोंदण फुलवून गेला

आता कशाचे भान कुणाला
गजर्‍याचाही भार जीवाला

खेळही आता जमू लागला
हार न जीत विसर पडला