Posts

Showing posts from 2021

स्थलांतर २

  स्थलांतर - २ आपला परिसर परका होतो. सगळं माहितीचं. ओळखीचं काहीच नाही, कुणीच नाही. ही सुरुवात असते बाजूला पडण्याची, तुटण्याची. आधी जागा नाकारते. मग माणसे नाकारतात. मग परिसर नाकारतो. मी अगतिक. धुंडाळते जुन्या जगाचे जुने कोपरे. माझा नाईलाज नेत राहतो मला जुन्या वाटांकडे. आता इथे थारा नाही. इमारती, माणसे, गाड्या सगळ्या गर्दीने कधीच फेकून दिलेय मला. आता शहरातल्या प्रत्येक क्षणी हे शहर मला नाकारते. माझे त्याचे नाते नाकारते, ओळख नाकारते, तात्पुरता आसराही नाकारते. शहराने हे फार पटकन अंगवळणी पाडून घेतलेय. आणि मी सगळीकडेच आगंतुक! - नी #स्थलांतरनोंदी .

स्थलांतर १

  स्थलांतर -१ स्थलांतर ही गमतीची गोष्ट असते. पिंड घडला त्या जागेचे सगळे लेप घेऊन नवीन ठिकाणी जायचं. त्या नवीन जगात डुबकी मारायची. काही लेप खरवडले जातात, काही विरघळून जातात आणि काहींच्यात नवीन रंग मिसळतो. नवीन जगाचे, माणसांचे नवीन लेपही चढतात. माझं काहीतरी मी दिलेलं असतंच त्या जगाला, त्या माणसांना. कधी एकटीने कधी कुणाबरोबर अशी स्थलांतरे होत राहतात. माणसं सुटतात, जोडली जातात. कधी नुसतीच जोडल्यासारखी वाटतात. तू कोण कुठली? प्रश्न भोवंडून टाकतो. मूळ जागा परकी झालेली असते. अधला मधला एक टप्पा माझा असतो आणि खरंतर नसतो. वर्तमान अजून माझे झालेले नसते. माझी मुळं सगळीकडून उखडल्यासारखी, सगळीकडेच रुजलेली. आणि मी प्रवासाची तहान लागलेली. - नी #स्थलांतरनोंदी

उजेडाच्या गोष्टी

  याच ठिकाणी चंद्राचा उजेडही येतो.   जगात काळोख पसरला की  आवाजही थांबतात.  कुठल्याही खिडकीतून  अंधाराला उजेडाने भोसकले जात नाही.  अंधार सलग होतो.  क्षितिजापर्यंत काळा.  समुद्राच्या रेषेशी ग्रे.  पाचूबंदराच्या रस्त्याची रेषा  मधेच उजळून निघते,  विजेच्या खांबावर ठिणग्या उडतात  आणि सगळे परत काळ्या रंगात मिसळून जाते.  या सगळ्यावर  शहाळ्यातल्या पातळ मलईसारखा  चंद्राचा उजेड असतो.  तोच उजेड माझ्या खिडकीतही असतो.  तो उजेड अंगावर घेत  आपण फक्त बघत बसायचं  या सगळ्याकडे.  शांतता माझ्या गाभ्यात उतरतेच.