Posts

Showing posts from 2009

क्रिएटिविटीच्या भुता...

क्रिएटिविटीच्या भुता, तुला कोटी कोटी प्रणाम. अचानक गायब होऊन आमची मारून ठेवणार्‍या तुझ्या कुत्रेपणाला काय म्हणावे!!! का मेल्या तू अस्तित्वातच नाहीस? तसं खरतर विश्वासही नाही माझा भुताखेतांवर, आत्म्यांवर त्यामुळे बहुतेक मला आत्मा नाही आणि क्रिएटिविटीचे भूत सुद्धा. . . -नी

कुणाच्या ह्या वेणा

कसल्या या खुणा कोण येउन गेलं इथे कुणाच्या ह्या वेणा रूतल्यात जिथे तिथे गेली असतिल इथून काही आतूर पावले थोडे घुंगरू पैंजणातून अलवार ओघळले वाळलेल्या पानावर हे खळ्ळकन पाणी आत आत कुठेतरी दुखली असेल राणी झाडे काळवंडलेली हवाही काळीशार थिजलेला गारवा रूततोय आरपार कुणी मंतरून ठेवले की शाप हा भोवला उभ्या राजस संध्येचा सूर असाच गोठला -नी

हंस उडू पाही...

चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे हंस उडू पाही अवघड इरादे अशी दरी खोल असे उंच कडे आभाळापल्याड झेपावती झाडे वारा सैरभैर, वेडी लाट फुटे धिटाईने घुसे कुणी एकटे एकटे लावले कुलुप, बंद केली दारे आतला हुंकार तरीही थरारे

झनन झन झन!

तुझ्या बोटांनी मल्हार छेडला माझा कण कण सतार झाला झनन झन झन खेळ रंगला गोंदण गोंदण फुलवून गेला आता कशाचे भान कुणाला गजर्‍याचाही भार जीवाला खेळही आता जमू लागला हार न जीत विसर पडला

या खेळावर

अर्थहीन सुरावटींना पाय फुटले, रूणझुणत भिंगोरल्या त्या याच्या कानावर, त्याच्या बोटांमधे आडवळणाची लय त्यांची घुमघुमत उगवत गेली तुझ्या गाभ्यावर माझ्या मनावर मनावर लयीचे लाखो धुमारे सरसरत पेटत राह्यले ह्या देहावर त्या वळणावर देहाची वळणे पाकळी पाकळी रिमझिम कोरत गेली इथल्या हवेवर या घटीकेवर जिथे तिथे बहरलेल्या सुरावटी मंद मंद झुळकत बसल्या या खेळावर या अर्थावर

निरगाठी...

तिने ठरवलंच होतं अंगाखांद्यावर खेळणारा झुरमुर अनुभवांचा गुंताडा, एकदा सोडवायचाच... ती मनाशीच घाबरली. अनुभव दुखावतील वितळून जातील ना.. तसं आवडत होतंच तिलाही अनुभवांच्या झुरमुरीत हरवून जाणं हरवतानाच तिला भान आलं गाठ घट्ट बसत चाललीये. ती थरकापली.. शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. झुरमुर अनुभव आठवणी झाले. निरगाठींचे चरे मात्र देहामनावर उरले... -नी

बिघडलीये काच!

खिडकीची काच बिघडलीये. दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली. एक साधंच एक डोळे वटारणारं. चोरून आणलेल्या चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे माझेच डोळे काचेत बसून रहातात. मी आक्रसत रहाते स्वतःला. त्याचा फोन.. एखादी धुंद आठवण.. एक गम्मतनाच.. जुनेपाने कपडे घालून वावर.. देहामनाची तगमग... सगळं सगळं त्या डोळ्यात टिपलं जातं. मी आक्रसत रहाते.. चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात खरंच बिघडलीये ही काच बदलली पाहिजे!

प्रिय मित्रा!!

क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे.... ----------------------------------------- तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही मी मोहरले नक्कीच हे तात्कालिकच आहे अशी समजूत घातली स्वतःची तगमग शांतवण्यासाठी 'का होईना! ओढ तर आहे' अशीही समजूत घातली मनाची सुखवून जाण्यासाठी.. या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे मी कधीच पाह्यलं नाही. गरज वाटली नाही भितीही वाटली. प्रिय मित्रा, मला सांग रे तात्कालिकची मर्यादा किती? किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती? की मिठी, चुंबन, देहापुरती? सांगच! बोलून टाकूया एकदा सगळं.. हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे! -नी

माझा मर्यादित शब्दकोश..

संवादायचंय खूप सारं.. मला असं होतं तुमचं काय? मी अशी, मी तशी तुमचं काय? अचानक घसा कोंडतो तेव्हा नाकात होणारी झर्रझुणझुण, अकारण अवेळी आगंतुकशी कणाकणातून खेळणारी वीज, ओढणीच्या चुण्याचुण्यांतून मनभर पसरणारी मखमल, सगळं असणं भरारी मारताना थिजून दगडलेले पाय, असं खूप सारं खूप आतलं खूप आपलं सवांदायचंय अमर्याद आणि मखरात नटून बसलाय माझा मर्यादित शब्दकोश...

बिलोरी आरसा!

आरश्याने पाठीमागे दडवून ठेवलेला मुखवटा दुपारी भेटला मला. तेव्हा आरश्याचा चेहरा पडला त्याचं बिंग फुटलं. त्या विखुरलेल्या तुकड्यात शंभर, हजारांच्या संख्येनं दिसत होता एक वाकडातिकडा चेहरा तूच आहेस ही मुखवट्याने आरोप केला. तो भयानक होता. तो लाजिरवाणा होता. तो माझाच होता. 'यासाठीच सांगत असतो काही गुपितं गुपितंच बरी' आरसा तुकड्यातुकड्यातून खदाखदा हसला. तुकड्यांना गप्प करण्यासाठी मी माझा चेहराच तुकड्यांवर मारला मुखवटाही मारला आरश्याचं हसणं बिलोरी होत गेलं. माझा चेहरा दिसेनासा होत गेला.

खुळ्या भिंगोर्‍या

Image
चळ लागल्या झुळझुळ रेषा त्यावरून नजर फिरवताना मी चित्रमित्राला विचारलं 'सांग की कुठून आणल्यास ह्या वाटा एकातएक मिसळणार्‍या आणि एकातून एक फुटणार्‍या? सांग ना कुठून आणलास लख्ख पिवळा रंग आणि पिवळट पाचोळा?' उत्तरादाखल तो स्वचित्रातून केवळ रोखून बघत राह्यला. आणि चित्रागणिक अजूनच विस्कटत, उसवत, पेटत गेला. त्याचे लाल केस भुरूभुरू जळत होते नजरेमधे ठिणग्या होत्या आणि उजव्या बाजूला कानाच्या जागी जखम होती. मग मला वाटत राह्यलं आपल्याला त्याच्या वाटा कळल्यात, पिवळट जाणीवांचा उगम हातीच आलाय.. आता त्याचं स्वचित्र खदाखदा हसलं पिवळा जांभळ्यात, जांभळा निळ्यात, निळा हिरव्यात हिरवा परत पिवळ्यात उडी मारून गेला रेषा खुळ्यासारख्या भिंगोरल्या .... .... मी अजून भिंगोर्‍याच खेळतेय!