Posts

Showing posts from June, 2016

पावसाची गंमत

अलेक पदमसींच्या घराच्या खिडकीतून पाउस बघताना सुचलेली. ही नंतर ’आतल्यासहित माणूस’ मधे वापरली होती. ----------------------------------------- तिची एक छोटीशी गंमत आहे. तिने स्वत:च गुंफलेली, स्वप्नाळू डोळ्यांनी कायम बघितलेली. पाउस येतो ना तेव्हा ती पावसाकडे बघते, आजूबाजूच्या भिंती अलगद विरघळून जातात, सगळेच आकार धुसर होतात, तिचा कणनकण पाऊस पिऊन घेतो, हळू हळू पाऊसच होत जातो, शेवटी तीही विरघळून जाते, पावसाच्या थेंबासारखी, अम्लान, अनावृत. अश्या तिच्या स्वप्नात तिची तंद्री लागून राहते, आणि मग कधी कधी खरंच ती पाऊस होते. - नी

अदृश्य! २

नजरेत न मावणार्‍या त्याला बघत ती सुखावते, त्याच्या सावलीच्या ओझ्याने उदासतेही त्याच्या डोळ्यांचा ती वेध घेउ पहाते स्वत:अचे हसू तिथे शोधू पहाते त्यातच तिची नजर हरवते तरीही पावलांचा जुळणारा ताल मात्र सुटत नाही ती हळूहळू त्या तालातच हरवायला लागते अचानक कुठूनतरी आभाळाचा एक चुकार तुकडा आपली सगळी मर्यादा सोडून तिच्या पुढ्यात येतो कशी आहेस तू? विचारतो, नी तिचा तालच बिघडतो तिला आठवतात त्या आभाळाने घातलेल्या शपथा, त्याला साक्षी ठेवून स्वत:अला दिलेली वचन. त्या चतकोर आभाळाला ती जवळ घेते नि वर पहाते परत तिला तिच जुनं आभाळ सापडतं हात पसरून ये म्हणणारं. नि त्याच्या डोळ्यातले तिचं हसूही. ती त्या छोटुल्या आभाळाला कुरवाळते.... आभाळ कुठले ते, तो तर त्याचा एक अश्रू असतो. आता त्या दोघांचा ताल पक्का आहे नि आपलं आभाळ मात्र तीनं आता खिडकीतच ठेवलेय... हरवू नये म्हणून... - नी

अदृश्य!

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती --------------------------------------- फुलांच्या पायघड्यांवरून त्याचा हात धरुन ती जात असते. त्याच्या वेगाशी जमवून घेताना ती बेभान होते. पावले थिरकायला लागतात, त्याच्या तालाशी जुळायला लागतात. ती खूश होते त्याच्यावर, स्वत:वर. हसते स्वत:च्या हसूची ओळख त्याच्या डोळ्यात शोधते. कधी कधी तीही मिळाल्यासारखी वाटते ती अजूनच खूश होते, हसते. कुणी बघत तर नाहीना, ती हळूच बघते हादरते, ती अदॄश्यच असते. अचानक आलेलं अदॄश्यपण तिला खूप दुखवून जातं. अगदी आत आत पर्यंत. 'कश्या पुसल्या गेल्या माझ्या रेषा?' डोळ्यात प्रश्न घेऊन ती आकाशाकडे पहाते याच आकाशाने तिला नेहमी हात पसरून ये म्हटलेलं असतं. आज ते आकाशच तिला दिसत नाहि. वर पहाता नजरेत न मावणारा तो असतो. नि तिच्यावर त्याची सावली पडलेली असते. - नी

आज.. उद्या... कधीतरी...

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती. ------------------------------------------------ आज.. उद्या... कधीतरी.. या तालातच आतलं काहीतरी फिरतंय. खूप खूप ठासून भरल्यासारखं काहीतरी आहे. स्फोट व्हावा किंवा गळू फुटावं, तसं ते बाहेर येणार. वाट बघणं चालू आहे. स्फोटासाठी सुद्धा एक काडी लागते, गळू फुटण्यासाठीही एक वार लागतो, प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो. मी त्या काडीची, त्या एका वाराची वाट बघतेय का? एवढी मोठी वेदना सोसण्याचं बळ खरंच माझ्यात आहे? हे असले प्रश्न येतात मनात आणि तिथेच.. माझ्या मिडीऑकर असण्याची खूण पटायला लागते ती खूण टाळण्यासाठी मी उगाचच प्रश्नांचं जाळं विणत रहाते. या जाळ्यातला प्रत्येक धागा माझ्या कमकुवतपणाची साक्ष देत रहातो. त्या साक्षीची वेदना वाढत रहाते. आतलं काहीतरी फिरतच असतं. मी वाटही बघत असते फुटण्याची. कदाचित अजून पूर्ण ठासून भरली नसेल वेदना ............ बहुतेक तेव्हाच माझ्या मर्यादित असण्याचा अंत असेल बहुतेक.. - नी

दुखरा फोड

जुनीच. "आतल्यासहित माणूस" या प्रयोगात होती. ---------------------------------------------------- दुखरा फोड फुटून जाताना क्षणिक तीव‘ कळ जाते. सगळा प्राण गळ्यात अडकतो, डोळ्यापुढून आयुष्य सरकते... हुश्श!!!... पुढचा क्षण घेऊन येतो एक सुटकेचा नि:श्वास, किंचित बधीरलेला मेंदू आणि खूपसा सैलावलेपणा. असं नेहमीच होतं... आयुष्य कापताना... पण हा सैलावलेपणा टिकत नाही... पुन्हा त्याच वर्तुळात फिरणे संपत नाही.. अगदी आभाळालाही हे चुकल नसावं.. दरवर्षी पावसानंतर ते असच सैल नी मोकळं दिसत रहातं पुढचा पाऊस लागेपर्यंत -  नी