स्थलांतर १

 स्थलांतर -१

स्थलांतर ही गमतीची गोष्ट असते.
पिंड घडला त्या जागेचे सगळे लेप घेऊन नवीन ठिकाणी जायचं.
त्या नवीन जगात डुबकी मारायची.
काही लेप खरवडले जातात,
काही विरघळून जातात
आणि काहींच्यात नवीन रंग मिसळतो.
नवीन जगाचे, माणसांचे नवीन लेपही चढतात.
माझं काहीतरी मी दिलेलं असतंच त्या जगाला,
त्या माणसांना.
कधी एकटीने कधी कुणाबरोबर
अशी स्थलांतरे होत राहतात.
माणसं सुटतात, जोडली जातात.
कधी नुसतीच जोडल्यासारखी वाटतात.
तू कोण कुठली? प्रश्न भोवंडून टाकतो.
मूळ जागा परकी झालेली असते.
अधला मधला एक टप्पा माझा असतो
आणि खरंतर नसतो.
वर्तमान अजून माझे झालेले नसते.
माझी मुळं सगळीकडून उखडल्यासारखी,
सगळीकडेच रुजलेली.
आणि मी प्रवासाची तहान लागलेली.
- नी

Comments

Popular posts from this blog

झण्ण

एक दो एक दो

अदृश्य!