Posts

Showing posts from March, 2016

वळूया!

प्लॅस्टिकचं हृदय, प्लॅस्टिकचेच भळभळणारे रक्त, दोन शब्द विंदांचे, दोन शब्द पाडगावकरांचे, एक कल्पना शांताबाईंची, एक यमक गदिमांचे, अजून काही ह्याचे, तजून काही त्याचे दुनियेभरचे तरल फरल फोटो सगळा स्टॉक डब्यात व्यवस्थित भरून ठेवलाय. सिच्युएशन, मूड, ऑडियन्सचा अंदाज घेऊन तुपावर बेसन भाजून.. हमखास डोळ्यातून पाणी, हृदयातून हुंकार, घशातून उसासा, अजून कुठूनतरी अजून काहीतरी काढायला लावणारे काव्यबोळे वळायला घ्यायला हवेत.. या.. वळा चार काव्यबोळे.. तुमचेही हात लागूद्यात.. मराठी नेटजगताचं वर्‍हाड मोठं, भिंत मोठी.. सर्वांना पुरायला हवेत. आणि बेदाण्यासारखा फोटो खोचायला विसरू नका या लवकर.. सुरू करू काम... - नी

कंटाळा

कंटाळा अस्वस्थ कंटाळा इथून तिथून, तुला मला, आतून बाहेरून, मुळापासून खच्ची करत जाणारा कं टा ळा स्वस्त, भडक, टिपटिप गळत राहतो कंटाळा पिरपिर, मचमच, कुरकुर गडद गडद गडद कंटाळा एक जिवंतपणाची खूण दिसावी वाट बघत राहतो कंटाळा. - नी

साद!

स्तब्ध निवळशंख पाणी बर्फाळ गुलाबी आसमंत ओलसर स्वच्छ शांतता पहाटेची वेळ गार पडलेले नाक पापण्यांवर झुरझुर बर्फ तसलेच झुरमुर वय अशी एक साद घातली होती तुझा प्रतिसाद आला की नाही आला? आला तर कुठल्या दिशेने आला? आठवतही नाही.. ती साद आठवते आणि एक सुंदर शांतता मनात झिरपत रहाते - नी

जग!

एका मैत्रिणीच्या तिने अर्धवट सोडलेल्या कवितेला उत्तर म्हणून हे खरडलं... ---------------------------------------------------------------------------------------- असंवेदनशीलतेचा ठप्पा चालणारे तुला? कठोर, रूक्ष, दगडी म्हणलेलं चालणारे तुला? आणि शेवटी धाय मोकलून रडत नाहीस म्हणजे बहुतेक स्त्री म्हणून कमीच असावीस... हे चालणारे तुला? फिकीर नसेल असल्या विशेषणांची तर ये.. आपण उभारू निर्भय, घट्ट, चिवट बायांचं जग... - नी

पाऊस....

पावसाचे महिने कवितांचा पूर सरी, बरसतात मेघ, दाटतात डोळे, भरतात पालवी, कोंब, फुटतात नवचैतन्य, संचारते आसंमंत, धुंद पाणी, रोंरावते शहर, ठप्प स्पिरीट स्पिरीट हृदय, द्रवते इत्यादी मागे-पुढे-पुढे-मागे-वर-खाली-खाली-वर भावना नुसत्या चिंब चिंब टपक टपक कविता टिपटिप जागतिक कंटाळा स्वस्त, गुळगुळीत, भडक पावसाचे अस्तित्व खर्‍या पावसात विरघळून नाहीसे होते. मनाला स्वच्छ, बरे वाटते -नी

बदनूर!

जुनीच. "आतल्यासहित माणूस" या प्रयोगात होती. ----------------------------------------------------- मोडकळीला आलेल्या गावाचे मोडकळलेले आकाश. आकाशाचा कण्हता सूर, आकाशाला इथे तिथे जखमा. जखमांतून ओघळले आकाशाचे जांभळे रक्त. एकेका थेंबाने मोजून घेतली स्व्तःच्या गळण्याची किंमत. आकाशाचा कण्हता सूर. आकाशाखालचा गाव बदनूर. आकाशाचे जांभळे रक्त समुद्रावर सांडले, गावावर सांडले. "मारा, झोडा!" च्या आरोळ्या देत तेही समुद्राला मिळाले. आकाशाखालचा गाव बदनूर आकाशाच्या कण्हत्या सुरात सूर मिसळू लागला मोडकळत्या गावातल्या मोडकळत्या घरांचे गंजलेले पत्रे समुद्राच्या रक्ताने रंगले. आणि घाबरून देवांनी, जिवांनी सामुदायिक आत्महत्या केली. - नी

क्षण क्षण!

जुनीच कविता. २००६ मधे 'आतल्यासहित माणूस' हा कवितांचा नाट्याविष्कार असा प्रयोग मी दिग्दर्शित केला होता. मायबोलीवर मला भेटलेल्या काही कवींच्या(बेटी, हेम्स, परागकण, पेशवा, शुमा, क्षिप्रा, गिरीराज, दिपक) आणि माझ्याही काही कवितांचा समावेश या प्रयोगात होता. २००५ मधे लिहिलेली ही खालची माझी कविता या प्रयोगात वापरली होती. --------------------------------------------------------------------------------- क्षण क्षण ठिबकतो घड्याळातून मातीत मिळतो. शोधू पहाता सापडत नाही. खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते सोन्याच्या अक्षरांची. एखादाच ते भाग्य घेऊन येतो. बाकीचे लिहितात तुमच्या आमच्या करंटेपणाचे वांझोटे आलेख. लागत असतील का त्या दुर्दैवी क्षणांचे शाप तुमच्या आमच्या कर्तृत्वाला? उत्तर हो च धरूया, शाप, दैव या भोवर्‍यातच तुमचा आमचा नाकर्तेपणा जन्म घेत असतो. - नी

काळाचे अनंत

काळाचे अनंत. आपण देतो त्याला परिमाणं मोजमापसाठी संदर्भासाठी.. करतो त्याचे तुकडे देत लयीचं नाव असं करताकरता वाटायला लागतं मीच नेतेय त्याला पुढे आणि इथेच तो माझ्यासाठी थांबतो म्हणजे तो जातोच पुढे पण मी थांबते, अडकते एका तुकड्यात. मग काळाचे वेगवेगळे तुकडे स्वतःचे संदर्भ सोडून मला भेटायला येतात... माझ्यावर आदळतात. त्यांना नसतो क्रम, नियम आणि अपवादही. माझा पूर्ण गोंधळ होतो. माझा तुकडा कुठला? आजचा तुकडा कुठला? व्हॉट काइंड ऑफ आयडिया आय अ‍ॅम? सगळंच मस्त उलटंपालटं होतं. निरर्थकही.. असं माझं वेड विकोपाला जात रहातं. मला मजा येत जाते आता तुम्ही गोंधळू लागता! - नी (२००७)