उजेडाच्या गोष्टी

 सोनमोहोराचा मोहोर खूप लवकर गळून गेलाय.

अर्धी झाडे जीव खाऊन कातरून टाकली आहेत.
त्यांच्या झाडांची सावली ह्यांच्या हद्दीत पडता कामा नये. 

खूप खूप खूप जास्त उजेड आहे इथे. 
तो आधार देतोय की जगणं शोषून घेतोय?
कळत नाही. पण तो असलेला बराय.

लांबवर समुद्राला असलेली सुरुच्या बनाची किनार दिसायची.
मशिदीपेक्षाही उंच होत जाणारी बिल्डिंग उभी राहतेय.
ती मध्ये येते. सुरुची किनार दिसत नाही.

भिंतीवर गोगलगायीच्या वेगाने उरकणारी कामांची यादी आहे. 
एवढी कामे आहेत हातात म्हणून बरे वाटून घेऊ?
ती संपली आणि पुढची मिळालीच नाहीत तर?

आसमंतात विविध कामे चालू आहेत.
रोज कुठले तरी मशीन कानांच्या चिरफळ्या उडवत असते.
बाहेरचे नाहीतर माझ्या हातातले. 

रोज विचित्र बातम्या. याच्यात्याच्यादूरच्याजवळच्या.
जगलो, वाचलो तर ठिक. नाहीतर एका संख्येची भर. 
मरायची भिती हा जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे.

अशामध्ये मेंदू का उडया मारतोय अचानक?
आकार, शब्द, माध्यम, रचना असं काहीही 
काळवेळ, ताळतंत्र सोडून फक्त उड्या, न झेपणाऱ्या!

ही उर्जा कशी सोसू? कशी रिचवू? कशी खेळवू?
हा तीव्र उजेड, मोठ्या बिल्डिंगीनेही न कापला जाणारा..
हा उजेड झेपेल का मला?
- नी 
#वसईडायरी 
#vasaidiaries
#morningpages 
#aimlessmusings
#उजेडाच्यागोष्टी
#प्रवाहीका

Comments

Popular posts from this blog

झण्ण

एक दो एक दो

अदृश्य!