Posts

Showing posts from 2020

झण्ण

एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात. तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही. तो ग्लानी तुटू देत नाही. आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो. लिखित शब्द, चित्रित कथा कशातही अडकू देत नाही. 'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?' ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो. मी कशातच अडकू शकत नाही. मी कशातच थांबू शकत नाही. मी थांबून काहीच करू शकत नाही. मी गुंगीतच असते. डोळ्यासमोर चालू असतात माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या, अविरत दळले जाणारे विनोद, याच्या त्याच्या नावाची अवतरणे, गुंगी तुटत नाही. माझ्या आत काही झिरपत नाही. त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने उन्मळून, कोसळून पडू देत नाही. त्याच्या तिच्या माझ्या आनंदाने भरभरून फुलू देत नाही. झण्ण विस्तारत चाललाय. हा प्रखर प्रकाश, हे मेलेले वारे झण्णला पोसतायत. भविष्य, भविष्याचे बेत वगैरे अफवा झाल्या आहेत. नजिकचा भूतकाळ झण्णच्या अस्तित्वाचे दाखले आहेत. फक्त झण्ण असणारे. माझा गाभा, माझे शरीर, मी व्यापलेली जागा सगळं झण्ण होणार! मी नाहीच उरणार. - नी

उजेडाच्या गोष्टी

 सोनमोहोराचा मोहोर खूप लवकर गळून गेलाय. अर्धी झाडे जीव खाऊन कातरून टाकली आहेत. त्यांच्या झाडांची सावली ह्यांच्या हद्दीत पडता कामा नये.  खूप खूप खूप जास्त उजेड आहे इथे.  तो आधार देतोय की जगणं शोषून घेतोय? कळत नाही. पण तो असलेला बराय. लांबवर समुद्राला असलेली सुरुच्या बनाची किनार दिसायची. मशिदीपेक्षाही उंच होत जाणारी बिल्डिंग उभी राहतेय. ती मध्ये येते. सुरुची किनार दिसत नाही. भिंतीवर गोगलगायीच्या वेगाने उरकणारी कामांची यादी आहे.  एवढी कामे आहेत हातात म्हणून बरे वाटून घेऊ? ती संपली आणि पुढची मिळालीच नाहीत तर? आसमंतात विविध कामे चालू आहेत. रोज कुठले तरी मशीन कानांच्या चिरफळ्या उडवत असते. बाहेरचे नाहीतर माझ्या हातातले.  रोज विचित्र बातम्या. याच्यात्याच्यादूरच्याजवळच्या. जगलो, वाचलो तर ठिक. नाहीतर एका संख्येची भर.  मरायची भिती हा जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. अशामध्ये मेंदू का उडया मारतोय अचानक? आकार, शब्द, माध्यम, रचना असं काहीही  काळवेळ, ताळतंत्र सोडून फक्त उड्या, न झेपणाऱ्या! ही उर्जा कशी सोसू? कशी रिचवू? कशी खेळवू? हा तीव्र उजेड, मोठ्या बिल्डिंगीनेही न कापला जाणारा.. हा उजेड झेपेल का मल