Posts

स्थलांतर २

  स्थलांतर - २ आपला परिसर परका होतो. सगळं माहितीचं. ओळखीचं काहीच नाही, कुणीच नाही. ही सुरुवात असते बाजूला पडण्याची, तुटण्याची. आधी जागा नाकारते. मग माणसे नाकारतात. मग परिसर नाकारतो. मी अगतिक. धुंडाळते जुन्या जगाचे जुने कोपरे. माझा नाईलाज नेत राहतो मला जुन्या वाटांकडे. आता इथे थारा नाही. इमारती, माणसे, गाड्या सगळ्या गर्दीने कधीच फेकून दिलेय मला. आता शहरातल्या प्रत्येक क्षणी हे शहर मला नाकारते. माझे त्याचे नाते नाकारते, ओळख नाकारते, तात्पुरता आसराही नाकारते. शहराने हे फार पटकन अंगवळणी पाडून घेतलेय. आणि मी सगळीकडेच आगंतुक! - नी #स्थलांतरनोंदी .

स्थलांतर १

  स्थलांतर -१ स्थलांतर ही गमतीची गोष्ट असते. पिंड घडला त्या जागेचे सगळे लेप घेऊन नवीन ठिकाणी जायचं. त्या नवीन जगात डुबकी मारायची. काही लेप खरवडले जातात, काही विरघळून जातात आणि काहींच्यात नवीन रंग मिसळतो. नवीन जगाचे, माणसांचे नवीन लेपही चढतात. माझं काहीतरी मी दिलेलं असतंच त्या जगाला, त्या माणसांना. कधी एकटीने कधी कुणाबरोबर अशी स्थलांतरे होत राहतात. माणसं सुटतात, जोडली जातात. कधी नुसतीच जोडल्यासारखी वाटतात. तू कोण कुठली? प्रश्न भोवंडून टाकतो. मूळ जागा परकी झालेली असते. अधला मधला एक टप्पा माझा असतो आणि खरंतर नसतो. वर्तमान अजून माझे झालेले नसते. माझी मुळं सगळीकडून उखडल्यासारखी, सगळीकडेच रुजलेली. आणि मी प्रवासाची तहान लागलेली. - नी #स्थलांतरनोंदी

उजेडाच्या गोष्टी

  याच ठिकाणी चंद्राचा उजेडही येतो.   जगात काळोख पसरला की  आवाजही थांबतात.  कुठल्याही खिडकीतून  अंधाराला उजेडाने भोसकले जात नाही.  अंधार सलग होतो.  क्षितिजापर्यंत काळा.  समुद्राच्या रेषेशी ग्रे.  पाचूबंदराच्या रस्त्याची रेषा  मधेच उजळून निघते,  विजेच्या खांबावर ठिणग्या उडतात  आणि सगळे परत काळ्या रंगात मिसळून जाते.  या सगळ्यावर  शहाळ्यातल्या पातळ मलईसारखा  चंद्राचा उजेड असतो.  तोच उजेड माझ्या खिडकीतही असतो.  तो उजेड अंगावर घेत  आपण फक्त बघत बसायचं  या सगळ्याकडे.  शांतता माझ्या गाभ्यात उतरतेच.

झण्ण

एक झण्ण आहे माझ्या गाभ्यात. तो बाहेरचं फार काही आत झिरपू देत नाही. तो ग्लानी तुटू देत नाही. आत येणारी कुठलीही संवेदना तो नाकारतो. लिखित शब्द, चित्रित कथा कशातही अडकू देत नाही. 'ते करायचंय ना? यात काय वेळ घालवतेस?' ज्यात त्यात हेच टोकत राहतो तो. मी कशातच अडकू शकत नाही. मी कशातच थांबू शकत नाही. मी थांबून काहीच करू शकत नाही. मी गुंगीतच असते. डोळ्यासमोर चालू असतात माझ्या गाभ्याला स्पर्शही न करू शकणाऱ्या कहाण्या, अविरत दळले जाणारे विनोद, याच्या त्याच्या नावाची अवतरणे, गुंगी तुटत नाही. माझ्या आत काही झिरपत नाही. त्याच्या तिच्या माझ्या दुःखाने उन्मळून, कोसळून पडू देत नाही. त्याच्या तिच्या माझ्या आनंदाने भरभरून फुलू देत नाही. झण्ण विस्तारत चाललाय. हा प्रखर प्रकाश, हे मेलेले वारे झण्णला पोसतायत. भविष्य, भविष्याचे बेत वगैरे अफवा झाल्या आहेत. नजिकचा भूतकाळ झण्णच्या अस्तित्वाचे दाखले आहेत. फक्त झण्ण असणारे. माझा गाभा, माझे शरीर, मी व्यापलेली जागा सगळं झण्ण होणार! मी नाहीच उरणार. - नी

उजेडाच्या गोष्टी

 सोनमोहोराचा मोहोर खूप लवकर गळून गेलाय. अर्धी झाडे जीव खाऊन कातरून टाकली आहेत. त्यांच्या झाडांची सावली ह्यांच्या हद्दीत पडता कामा नये.  खूप खूप खूप जास्त उजेड आहे इथे.  तो आधार देतोय की जगणं शोषून घेतोय? कळत नाही. पण तो असलेला बराय. लांबवर समुद्राला असलेली सुरुच्या बनाची किनार दिसायची. मशिदीपेक्षाही उंच होत जाणारी बिल्डिंग उभी राहतेय. ती मध्ये येते. सुरुची किनार दिसत नाही. भिंतीवर गोगलगायीच्या वेगाने उरकणारी कामांची यादी आहे.  एवढी कामे आहेत हातात म्हणून बरे वाटून घेऊ? ती संपली आणि पुढची मिळालीच नाहीत तर? आसमंतात विविध कामे चालू आहेत. रोज कुठले तरी मशीन कानांच्या चिरफळ्या उडवत असते. बाहेरचे नाहीतर माझ्या हातातले.  रोज विचित्र बातम्या. याच्यात्याच्यादूरच्याजवळच्या. जगलो, वाचलो तर ठिक. नाहीतर एका संख्येची भर.  मरायची भिती हा जगण्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. अशामध्ये मेंदू का उडया मारतोय अचानक? आकार, शब्द, माध्यम, रचना असं काहीही  काळवेळ, ताळतंत्र सोडून फक्त उड्या, न झेपणाऱ्या! ही उर्जा कशी सोसू? कशी रिचवू? कशी खेळवू? हा तीव्र उजेड, मोठ्या बिल्डिंगीनेही न कापला जाणारा.. हा उजेड झेपेल का मल

उजेडाच्या गोष्टी १

  भरपूर उजेड आहे इथे. इतका उजेड मला झेपेल का? इतका उजेड मला पुरेल का? हा उजेड माझा व्हायला हवा. करू अशी आशा? आहे मला परवानगी? की नकोच? जराशी तिरीप आणि कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो. कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो बरेचसे चोची मारतात तरीही उजेड हवाय मला. माझा माझा. तळघराचा तळ गाठून झाला असावा. आता बाहेर यायचंय. हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो. माझा वाटा हवाय. - नी (लिखाणातून) #उजेडाच्यागोष्टी #वसईडायरी #vasaidiaries #प्रवाहीका

तुकडे

पेशी दुंभगतात आणि जोडून राहतात असे काही तुकडे. शिवण घालून जोडले जातात, अंगचेच होतात असे गोधडीसारखे काही तुकडे. माझे आणि माझ्या जगाचेही.  जगाचा एक तुकडा माझ्या एका तुकड्याला ओळखतो. दुसरा दुसर्‍याला. जग तुकड्यापुरतं मीही तुकड्यापुरतीच अनोळखी तुकड्यांची वाट दिसत नाही, बघाविशी वाटत नाही जगाला आणि मलाही. जगाला मी कळलेली असते आणि मला जग.  - नी