उजेडाच्या गोष्टी

 याच ठिकाणी चंद्राचा उजेडही येतो. 

जगात काळोख पसरला की 
आवाजही थांबतात. 
कुठल्याही खिडकीतून 
अंधाराला उजेडाने भोसकले जात नाही. 
अंधार सलग होतो. 
क्षितिजापर्यंत काळा. 
समुद्राच्या रेषेशी ग्रे. 
पाचूबंदराच्या रस्त्याची रेषा 
मधेच उजळून निघते, 
विजेच्या खांबावर ठिणग्या उडतात 
आणि सगळे परत काळ्या रंगात मिसळून जाते. 
या सगळ्यावर 
शहाळ्यातल्या पातळ मलईसारखा 
चंद्राचा उजेड असतो. 
तोच उजेड माझ्या खिडकीतही असतो. 
तो उजेड अंगावर घेत 
आपण फक्त बघत बसायचं 
या सगळ्याकडे. 
शांतता माझ्या गाभ्यात उतरतेच.

Comments

Popular posts from this blog

झण्ण

एक दो एक दो

अदृश्य!