11:41 AM

बिलोरी आरसा!

आरश्याने पाठीमागे दडवून ठेवलेला मुखवटा
दुपारी भेटला मला.
तेव्हा आरश्याचा चेहरा पडला
त्याचं बिंग फुटलं.
त्या विखुरलेल्या तुकड्यात
शंभर, हजारांच्या संख्येनं दिसत होता
एक वाकडातिकडा चेहरा

तूच आहेस ही
मुखवट्याने आरोप केला.

तो भयानक होता.
तो लाजिरवाणा होता.
तो माझाच होता.

'यासाठीच सांगत असतो
काही गुपितं गुपितंच बरी'
आरसा तुकड्यातुकड्यातून
खदाखदा हसला.

तुकड्यांना गप्प करण्यासाठी
मी माझा चेहराच तुकड्यांवर मारला
मुखवटाही मारला

आरश्याचं हसणं बिलोरी होत गेलं.
माझा चेहरा दिसेनासा होत गेला.

0 comments:

Post a Comment